दिल्लीत महिला खासदारही असुरक्षित; चोरांनी कांग्रेसच्या महिला खासदाराच्या गळ्यातील चेन हिसकावली
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चीला जातो. सर्व सामान्य महिलांवर होणारे अन्याय याच्या आपण नेहमीच बातम्या ऐकतो पहातो. एकीकडे सर्व सामान्य महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना आता थेट महिला खासदार ही असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत चाणक्यपुरी या सर्वात गजबजलेल्या आणि सुरक्षित ठिकाणीच महिला खासदाराच्या गळ्यातील चैन खेचण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत महिला खासदार जखमीही झाली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सध्या संसदेचे अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे सर्व खासदार हे दिल्लीत आहेत. काँग्रेसच्या खासदार आर. सुधा या दिल्लीतील चाणक्यपुरी या भागात सरकारी निवासस्थानी राहातात. त्या तामिळनाडू मधून निवडून येतात. त्या सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. त्याच वेळी त्यांच्या मागून दोन युवक मोटरसायकल वरून आले. त्यांनी त्यांना हिसका देत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. त्यानंतर क्षणात ते तिथून पसार झाले.
आर. सुधा या आपल्या सरकारी निवासस्थानातून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. तामिळनाडू भवन येथून जात असतानाच बाईकवरून आलेल्या चोरानं त्यांची सोनसाखळी हिसकावून पळवली. या झटापटीत त्यांच्या गळ्याला जखम झाली आहे. त्यानंतर आर सुधा यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी आता एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी १० टीम तयार केल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून सोनसाखळी चोरांचा शोध सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी महिला असुरक्षित आहेत. त्यांच्या बरोबर काही ना काही घटना या होत असतात. आता तर देशाच्या राजधानीत एक महिला खासदारच असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. ते ही संसदेचे अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे काँग्रेस खासदार आर. सुधा यांनी हा प्रश्न लोकसभेतही उपस्थित केला. महिलांच्या सुक्षेला प्राधान्य दिलंच पाहीजे असंही त्यांनी या निमित्ताने सांगितलं.