सफेद चावल कोडवर्ड वापरुन एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
अमरावती – अमरावतीत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘सफेद चावल’ हा कोडवर्डने वापरून आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करत होते. दोन्ही डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ३८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अमरावती शहरात एम.डी. ड्रग्ज या कोडनेमने हस्तकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत हे एमडी ड्रग्ज पोहोचवले जात होते. सर्वसामान्य व्यक्तींसमोरसुद्धा ते मोबाईलवर ‘सफेद चावल’ आया, कितना और कहां भेजू? असं म्हणत ते अमरावती शहरातील ग्राहकांपर्यंत एमडी ड्रग्ज पुरवत असत, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
दरम्यान या प्रकरणात पकडलेल्या दोन डिलिव्हरी बॉयना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन आरोपींकडून ११० ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३८ लाख रुपये आहे. अमरावतीत एमडी ड्रग्ज तस्करी होऊ नये यासाठी वारंवार शहरात नाकेबंदी केली जाते. तसेच या गुन्हेगारांवर वेळोवेळी कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. तसेच पालकांनी आपली मुले हे व्यसनाधीनतेकडे जात तर नाही ना याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.