चुनाभट्टी परिसरात अल्पवयीन मुलावर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात तर १८ वर्षांच्या तरुणाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील चुनाभट्टी परिसरात उघडकीस आली आहे. येथे एका १० वर्षांच्या अल्पवयीन मुलावर तिघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, तीन आरोपींपैकी दोघे हे १८ वर्षांखालील म्हणजेच स्वतः अल्पवयीन आहेत, तर एक १८ वर्षांचा तरुण आहे. निर्जनस्थळी नेऊन या चिमुरड्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चुनाभट्टी येथील रहिवासी असलेल्या या १० वर्षीय मुलावर तिघांनी अत्याचार केला. पीडित मुलगा आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. याच ओळखीचा फायदा घेत आरोपींनी त्याला फसवून चुनाभट्टी येथील एका निर्मनुष्य ठिकाणी नेले. तिथे तिघांनी आळीपाळीने त्याच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
घरी परतल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगा अत्यंत भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याच्या आईने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार सांगितला. हे ऐकून आईला मोठा धक्का बसला. अखेर त्यांनी हिंमत करून पोलिसांत धाव घेतली आणि सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पीडित मुलाच्या आईने चुनाभट्टी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दोन अल्पवयीन आरोपींना डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर १८ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ११५ (२) व ३ (५) आणि पॉक्सो कायद्यातील कलम ६ आणि १० अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.