घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री; भेटायला बोलावून अंधेरीत बलात्कार, एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंधेरी परिसरात एका हॉटेलमध्ये उत्तराखंडमधील घटस्फोटित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बंटी वाकुर्डे उर्फ अप्पासाहेब उर्फ तुकाराम वाकोडे (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे ना आहे. आरोपीने पीडित महिलेला लोणावळा येथे पर्यटनाच्या बहाण्याने मुंबईत बोलावून घेतले होते, अशी माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची उत्तराखंडची रहिवासी आहे. पीडिताचे २०१६ मध्ये लग्न झाले. परंतु, कौटुंबिक वादामुळे तिचा घटस्फोट झाला असून आता ती आपल्या दोन मुलांसह राहत आहे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. दरम्यान, जून २०२५ मध्ये पीडिता फेसबुकच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आली. त्यावेळी आरोपीने पीडिताला तो सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगितले.
दरम्यान, १६ जुलै रोजी आरोपीने पीडितेला भेटायला बोलावले. १७ जुलैला पीडिता मुंबईत आल्यानंतर आरोपीने तिची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यानतंर १८ जुलैला तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले, जिथे दोघांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर आरोपीने पीडिताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेने प्रतिकार केला. मात्र, त्यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडिताला धमकी दिली आणि जबरदस्तीने दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितासाठी तिकीट बुक करून तिला पुन्हा उत्तराखंडमध्ये जाण्यास सांगितले. घाबरलेल्या आणि मानसिकरित्या अस्वस्थ झालेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.