मुंबईत तीन मजली चाळीचा भाग कोसळन ७ जण जखमी; अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली. भारत नगर भागात शुक्रवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी असलेल्या एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:५६ वाजता भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ चा दुसरा आणि तिसरा मजला कोसळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ८ ते १० लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई फायर ब्रिगेडने तात्काळ लेव्हल-२ चा अलर्ट जारी करत बचाव मोहीम हाती घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई पोलीस, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, अदानी ग्रुप, बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका असे अनेक विभाग आणि संस्था बचावकार्यात सक्रियपणे सहभागी झाले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव मोहिमेसाठी २ सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी,५ वरिष्ठ फायर ऑफिसर, १ स्टेशन ऑफिसर, ५ फायर इंजिन, १ मोबाइल वर्कशॉप टीम, १ कमांड आणि कंट्रोल फायर युनिट, १ फोर्स टेंडर (एफटी), १ रेस्क्यू व्हेईकल, आणि १ वॉटर क्विक रिस्पॉन्स व्हेईकल असे मोठे पथक तैनात करण्यात आले. आतापर्यंत ७ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे बचावकार्य पूर्ण होईपर्यंत स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.