माणुसकीला काळीमा, रुग्णवाहिकेच्या भाड्यावरुन दोन चालकांमध्ये जुंपली; मजुराचा मृतदेह ३ तास रुग्णालयाबाहेर पडून

Spread the love

माणुसकीला काळीमा, रुग्णवाहिकेच्या भाड्यावरुन दोन चालकांमध्ये जुंपली; मजुराचा मृतदेह ३ तास रुग्णालयाबाहेर पडून

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांनी केलेल्या दादागिरीमुळे एका मजुराचा मृतदेह तब्बल तीन तास शवागृहात पडून राहिल्याची बाब समोर आली आहे. भाडे कमी देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला थेट अडवण्यात आले. या प्रकारामुळे माणुसकीचाच जणू मृत्यच झालाय अशी चर्चा रुग्णालय परिसरात रंगली होती. विशेष म्हणजे या प्रकारामुळे मृतदेहाची देखील विटंबना झाल्याचे काहींनी म्हटले आहे. दरम्यान, केडीएमसी रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडत असल्याने केडीएमसी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी काय करतात? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमधील एका इमारतीवरुन पडून मृत्यूमुखी पडला. त्याच्या मृतदेहावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मजूर करियाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला तीन मुली आहेत. वडिलांच्या मुजरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे, कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. विशेष म्हणजे, येथील नातेवाईक आणि मित्रांनी पैसे गोळा करुन करियाचा मृतदेह तेलंगणातील गावात घेऊन जाण्याचे ठरवले. त्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालक रोशन शेख याच्याशी संपर्क केला असता, त्याने २५,००० रुपये भाडे मागणी केली. त्यावेळी, कुटुंबाने पैसे कमी करण्याची विनंती केली, परंतु रोशन शेखने ती मागणी नाकारली. त्याचवेळी दुसरा चालक समीर मेमन १५ हजार रुपयांत मृतदेह घेऊन जाण्यास तयार झाला होता. त्यामुळे, करियाच्या नातेवाईकांनी त्याला होकार दिला. पण, रोशन शेखने समीरला मज्जाव करत वाद घातला. या दोघांच्या वादात मृतदेहर रुग्णालयाबाहेरच पडून राहिला.रुग्णावाहिकेचे भाडे ठरवण्यावरून दोन्ही रुग्णवाहिका चालकांमध्ये ३ तासांहून अधिक काळ वाद सुरू राहिला. त्यामुळे करियाचा मृतदेह इतकाच वेळ शवगृहात पडून होता.

याप्रकरणी, रुग्णवाहिका चालक समीर मेमन याचे म्हणणे आहे की, “मी गोरगरीबांची स्थिती पाहून कमी दरात तयार झालो, पण इथे कोणतेही युनियन नसताना दुसरा चालक ‘युनियन’च्या नावाखाली दादागिरी करतो.” आहे. दुसरीकडे रोशन शेखने सांगितले की, “७०० किमी अंतरासाठी २५ हजार रुपये भाडे योग्य होते. आम्ही कोणालाही अडवले नाही.”. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांत संतापाची लाट पसरली असून “रुग्णालयाच्या बाहेर गरिबांची लूट आणि रुग्णवाहिका चालकांची मुजोरी ही काही नवी गोष्ट राहिली नसल्याचे स्थानिक सांगतात. तर, केडीएमसी प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, याआधीही फक्त एक हजार रुपयांवरून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना याच रुग्णालयात घडली होती. त्यामुळे, केडीएमसी प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी, प्रशासन नेमकं काय करतय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon