अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो, दादा अडचणीत येणार?

Spread the love

अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो, दादा अडचणीत येणार?

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस जवळ आला आहे. त्यामुळे परळीत कार्यकर्त्यांकडून या दोघांच्या वाढदिवसाचा मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामुळे शहरभर शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र यातील काही बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या जेलची हवा खात असलेल्या वाल्मिक कराडचा फोटो लावण्यात आला आहे. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, पोलीस ठाणे परिसर आणि रेल्वे उड्डाणपूल परिसरात लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनरांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा फोटो झळकला आहे. विशेष म्हणजे, वाल्मीक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या दोषमुक्तीबाबतचा निर्णय २२ जुलै रोजी होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर, वाढदिवसाच्या बॅनरवर त्याचा फोटो झळकणं अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या प्रकारामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामधील आरोपीच्या उपस्थितीबाबत पक्षाकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राजकीय वर्तुळात हे बॅनर नेमकं कोणाच्या संमतीने लावण्यात आले, यावरही चर्चा सुरु आहे. विशेषतः एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपीच्या छायाचित्राचा वापर करून राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर तयार होणं, हे नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कितपत योग्य आहे, यावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. आपण या खूनात नव्हतो असा त्याने वारंवार दावा केला आहे. मात्र त्याच्या विरोधात एसआयटीकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग हा खडतर झाला आहे. सुटण्यासाठी त्याने जिवाचा आटापीटाही केला आहे. मात्र अद्याप तरी त्याला यात यश आलं नाही. वाल्मिक विरोधात मोठ्या प्रमाणात संतापाची भावान आहे. अशा वेळी त्याचा फोटो शुभेच्छा बॅनरवर कसा आला. कुणाच्या सांगण्यावरून आला याची चर्चा सध्या परळीत रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon