अंधेरीत २.३६ कोटींच्या अंमली पदार्थांची तस्करी उधळली; दोन आरोपी अटकेत
मुंबई – अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंधेरी (पश्चिम) परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण २.३६ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ आणि १८ लाखांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई आझाद मैदान युनिट आणि कांदिवली युनिट यांनी अनुक्रमे ७ व ८ जुलै रोजी केली.
पहिली कारवाई:
०७ जुलै रोजी आझाद मैदान युनिटने लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम येथे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत एक इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७०३ ग्रॅम ‘चरस’, १०४ ग्रॅम ‘मेफेड्रॉन (एम.डी.)’, आणि १८ लाख रुपये रोख
जप्त करण्यात आले. जप्त अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे १.१४ कोटी रुपये असून, आरोपीविरुद्ध गु.र.क्र. ५५/२०२५, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई:
०८ जुलै रोजी कांदिवली युनिटने वर्सोवा, अंधेरी पश्चिम येथे गस्तीदरम्यान दुसऱ्या इसमाला अटक केली. त्याच्याकडून ३०६ ग्रॅम ‘हेरॉईन’ जप्त करण्यात आले, ज्याची बाजारमूल्य सुमारे १.२२ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी गु.र.क्र. ५६/२०२५, एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. १: वय ४६ वर्षे, अंधेरी परिसरातील तर आरोपी क्र. २: वय ३१ वर्षे, वर्सोवा, अंधेरी. या दोघांनीही अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर ‘हेरॉईन’, ‘एम.डी.’ आणि ‘चरस’ यांची तस्करी सुरू केली होती, असे तपासात उघड झाले आहे. सध्या अधिक तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
अंमली पदार्थ विक्रीबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास नागरिकांनी ९८१९१११२२२ (मुंबई गुन्हे शाखा इन्फोलाईन) किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ‘मानस’ हेल्पलाइन क्रमांक १९३३ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल.
सदर यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, उप आयुक्त नवनाथ ढवळे, व सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी अधिकारी म्हणून आझाद मैदान युनिटचे पो.नि. राजेंद्र दहिफळे व कांदिवली युनिटचे वरिष्ठ पो.नि. शशिकांत जगदाळे यांनी विशेष भूमिका बजावली.