मंचरमध्ये महिला पत्रकारवर हल्ला; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मंचर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात सुधाकर बाबुराव काळे (रा. मुळेवाडी रोड, मंचर) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवार, ५ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निघोटवाडी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर ४१/१ मध्ये पांडुरंग सखाराम मोरडे यांनी अनधिकृतपणे पत्राशेड आणि दुकाने बांधली होती. या प्रकरणात जमीन मालकांनी पत्रकार स्नेहा बारवे यांना माहिती दिली होती. त्या ठिकाणी स्नेहा बारवे बातमीसाठी पोहोचल्यावर, पांडुरंग मोरडे, त्याचे पुत्र प्रशांत मोरडे, निलेश मोरडे (सर्व रा. मंचर) आणि इतर आठ ते नऊ अनोळखी लोक घटनास्थळी आले.
त्यांनी एकत्रितपणे लाकडी दांडका, प्लॅस्टिकच्या कॅरेट आणि लाथा-बुक्क्यांनी पत्रकार स्नेहा बारवे, विजेंद्र थोरात, संतोष काळे आणि सुधाकर काळे यांना मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान पीडितांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात पांडुरंग मोरडे, त्याचे दोन पुत्र आणि आठ ते नऊ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर करत आहेत.