मकोका सजा भोगून बाहेर आलेल्या अरविंद सोढाच्या टोळीची पुन्हा दहशत; चेंबूरात गुर्गे सक्रिय
पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – कुख्यात गुंड अरविंद सोढा नुकताच मकोका अंतर्गत ठाणे कारागृहातून सुटून बाहेर आला असून, तो सध्या नवी मुंबईतील नेरुळ येथे वास्तव्यास आहे. मात्र त्याच्या चेंबूर-टिळकनगर परिसरातील गुंडांनी पुन्हा सक्रिय होत परिसरातील व्यापाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद सोढाने याआधी दोनदा मकोका अंतर्गत सजा भोगली आहे. तो बाहेर येताच त्याचे चेंबूरमधील गुर्गे पुन्हा एकवटले असून, त्यांनी पी. एल. लोखंडे मार्ग, नागवाडी, कादरिया नगर या परिसरात धमकावण्या आणि हफ्ता वसुली सुरू केल्याची माहिती आहे.
या टोळीच्या हालचालीवर पोलिस ठाणे, डीसीपी स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट ६ कडून बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. पोलिसांकडे टोळीतील गुन्हेगारांची नावे, पत्ते आणि त्यांच्या हालचालींची सविस्तर माहिती असून, गुन्हेगारांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, चेंबूर परिसरात अरविंद सोढाच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांकडून हफ्ता वसूल करण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीच्या हालचालींवर सतत नजर ठेवली असून, कोणताही गैरप्रकार घडताच कारवाईसाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी धमकी मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.