वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २ नराधमांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
दौंड – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात काही दिवसांपूर्वी एक लुटीची घटना उघडकीस आली होती. मध्यरात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी यावेळी एका वारकऱ्यांच्या गळ्यावर कोयता लावून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना पकडलं आहे. मागील दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांचा शोध घेत होते. अखेर पुणे पोलिसांना दोघांन पकडण्यात यश आलं आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोन्ही आरोपींनी ३० जून रोजी पंढरपुरला देव दर्शनासाठी जात असताना वाटेत चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना लुटलं होतं. तसेच त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता.रविवारी दोन्ही आरोपींना बारामती सेशल कोर्टात हजर करण्यात आले.
३० जून रोजी सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास काहीजण पुणे-सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. पहाटे चारच्या सुमारास दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात भाविक चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. त्यांनी काही कळायच्या आत दोघांनी सोबत आणलेली मिरचीपूड एका महिलेच्या तोंडावर फेकली. यानंतर आरोपींनी महिल्याच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने ओरबडून घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. नराधमांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं. याठिकाणी दोघांनीही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.