७४ किलो गांजासह ३७ लाखांचा साठा जप्त; भिवंडीत ३ आरोपी अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७४ किलो ५४८ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारमूल्य ३७ लाख ३७ हजार ४०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्गा रोड, मोमीनबाग, भिवंडी येथे फैजल अकबर अन्सारी नामक इसम गांजाची विक्री करण्यासाठी अब्दुल रहमान अन्सारी याला भेटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीच्या पथकाने सापळा रचला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि धनराज केदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचूक कारवाई करत फैजल अकबर अन्सारी (वय ४४) – राहणार हाजीमंलगवाडी, कल्याण, अब्दुल रहमान मुजाहिद अन्सारी (वय २०) – राहणार मेहबुब अपार्टमेंट, मोमीनबाग, भिवंडी व अन्वर जमीलुद्दीन अन्सारी (वय ३४) – राहणार घर क्र. २११, मोमीनबाग, भिवंडी यांना अटक केली. तपासादरम्यान, आरोपी क्रमांक १ व २ यांच्या अंगझडतीत आणि आरोपी क्रमांक ३ च्या घराच्या पडवीतून अंमली पदार्थ सापडला. संपूर्ण ७४ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत ₹३७,३७,४०० इतकी आहे.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९९८/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्यानुसार कलम ८(क), २०(ब) ii(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा, घटक २, भिवंडी करत आहे. सदर यशस्वी कारवाई डॉ. पंजाबराव उगले (अप्पर पोलीस आयुक्त), अमरसिंह जाधव (पोलीस उप आयुक्त), शेखर बागडे (सहा. पोलीस आयुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत जनार्दन सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), सपोनि श्रीराज माळी, सपोनि धनराज केदार, पोउपनि रविंद्र पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोहवा सुदेश घाग, प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, मपोहवा अनुष्का पाटील, पोशि अमोल इंगळे, भावेश घरत, चालक पोशि रविंद्र साळुंखे या पथकाने सहभाग घेतला. पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात केलेल्या या कारवाईमुळे भिवंडी परिसरातील गैरप्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.