प्रेमाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग: कॉलेज तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, तिचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पार्थ शिंदे, रोहन चाबुकस्वार, सुरज भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे आणि तुषार जगदाळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर घटना १६ जानेवारी २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीत ही घटना घडली असून, यामध्ये पीडित तरुणीचा मानसिक आणि सामाजिक छळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पीडित तरुणीची ओळख आरोपी पार्थ शिंदे याच्याशी तिच्या मैत्रिणीमुळे झाली. काही दिवसांमध्ये पार्थने तिच्याशी मैत्री करत प्रेमाचे नाटक केले. १३ जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त त्यांनी एकत्र फोटो काढले. त्यानंतर १६ जानेवारीला कॉलेजमध्ये भेट घेऊन पार्थने तिला शरीरसंबंध ठेवण्याचा प्रस्ताव दिला. नकार दिल्यावर त्याने पाठलाग सुरू केला. काही दिवसांनी ‘द कॉफी कॅफे’ येथे भेटीच्या वेळी त्याने पीडितेचा नकळत व्हिडिओ घेतला आणि विनयभंग केला. पुढे व्हाट्सअप कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडून अश्लील व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल केलं. त्याचबरोबर तिच्या बहिणीला आणि नातेवाईकांना देखील व्हिडिओ व फोटो पाठवून मानसिक त्रास दिला. २९ जून रोजी पार्थसह इतर पाच जणांनी पीडितेच्या नातेवाईकांना फोन करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. रोहन चाबुकस्वार याने तर पीडितेला शिवीगाळ करत धमकी दिली.
१९ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने अखेर वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून वरील सहा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ७४, ७५(१), ७८, ७९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५);
एससी/एसटी कायदा कलम ३(२), ३(१)(थ)(ख), (खख)६;
आयटी कायदा कलम ६६(ई), ६७, ६७ (अ). या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, महाविद्यालयीन वयातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचा गंभीर इशारा मिळाला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.