पाण्याचा कॉक बंद करण्यासाठी छतावर गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – इमारतीच्या छतावरुन कोसळून एका २० वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या छतावरून कोसळून या वीस वर्षीय युवतीचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबतची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. एका तरुणीचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी वय (२०) ही तरुणी राहत होती. २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया चौधरी ही तरुणी इमारतीमध्ये येणारे बोरींगच्या पाण्याचा जल वहिनीचा कॉक बंद करण्यसाठी इमारतीच्या छतावर गेली होती.
त्यावेळी रिया हिचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली डकमध्ये पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच कुटुंबाने तिला तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. महाड ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिया चौधरी हिला तपासून मृत घोषित केले.रिया चौधरी ही इमारतीवरून पडल्याने तिच्या डोक्याला लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील. अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.