खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या ३ अल्पवयीन मुलांचा मृत्यू, मृतात २ सख्या भावांचा समावेश
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – बोईसरमध्ये एक धक्कादायक घडना घडली आहे. खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरज यादव, धीरज यादव, अंकित गुप्ता अशी या मृत अल्पवयीन मुलांची नावे आहेत. बोईसरमधील गणेश नगर परिसरात असलेल्या खासगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी चार जण गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेली. मात्र पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यात यश मिळालं. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.