अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशात जाण्याचा प्लॅन; चोवीस तासात अपहृत मुलीची सुखरूप सुटका, आरोपीला ठोकल्या बेड्या

Spread the love

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशात जाण्याचा प्लॅन; चोवीस तासात अपहृत मुलीची सुखरूप सुटका, आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

बदलापूर – बदलापुरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासचक्रे वेगाने फिरवीत अवघ्या चोवीस तासात अपहृत मुलीची सुखरूप सुटका केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. अपहरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव रंजित धूर्वे (२५) असे आहे. आरोपी मूळचा मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील मोरडोंगरी येथे राहणारा असून गेल्या काही महिन्यांपासून तो बदलापुरात बिगारी काम करत होता. त्याने मंगळवारी दुपारी बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी भागात राहणाऱ्या एका साडेचार वर्षीय मुलीचे चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अपहरण केले. त्यामुळे धास्तावलेल्या या मुलीच्या कुटुंबियांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासचक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली.

बदलापूर पश्चिम पोलिस ठाणे व उल्हासनगर युनिट ४ गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात बदलापूर परीसर तसेच रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी अपहरणकर्ता अल्पवयीन मुलीला घेऊन मध्यप्रदेश मधील मोरडोंगरी येथे जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथक तातडीने मध्यप्रदेश राज्यातील उमरेठ पोलीस ठाण्यात गेले आणि स्थानिक पोलीसांचे मदतीने रंजीत धुर्वे याला ताब्यात घेऊन अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका केली.

पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, संजय जाधव, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे, शेखर बागडे, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी. अशोक कोळी, सपोनि श्रीरंग गोसावी, पोउपनिरी नागेश्वर मुंडे, अशोक पवार, पो.हवा.गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, चंद्रकांत पाटील, मंगेश जाधव, चंद्रकांत सांवत, सुरेश जाधव, पो.शि. रामदास उगले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आरपीएफचे पोलिस निरीक्षक संदीप ओंबासे, मपोउनि. सोनाली नंदेश्वर तसेच आरपीएफ अंबरनाथ व कल्याण विभागानेही या तपासात सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon