कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाचा आईसमोरच चोरी करण्याचा प्रयत्न; आरोपीला पोलिसांनी केलीय अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मुंबई जवळची वेगानं वाढणारी उपनगरं असा कल्याण-डोंबिवलीचा लौकीक आहे. या शहराची लोकसंख्या वेगानं वाढतीय. त्याच पटीत येथील गुन्हे देखील वाढत आहेत. कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरी करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या भागात अजहर मणियार या रिक्षाचालकाचं घर आहे. त्याचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता. फजलची आई घरात स्वयंपाक करत होती. तो मुलगा घराच्या दारात उभा होता. तितक्यात एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ घेतले. आरोपीनं मुलाला जबरदस्तीनं घेतल्यानं मुलगा जोरात रडू लागला. मुलाचे रडणे ऐकून परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेलं.
मुलाला घेऊन जाणारी व्यक्ती नवीन दिसल्यानं लोकांना संशय आला. त्यांनी आरोपीची विचारणा केली. त्याला उत्तर देता आले नाही. लोकांना पाहून तो घाबरला. त्यावेळी आरोपी मुलगा चोरण्यासाठी आल्याचं लोकांच्या लक्षात आलं. काही जणांनी त्याला मारहण केली. त्यानंतर त्याला बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बाबासाहेब डुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पूरीमणी आहे. तो सोलापूरमधील शास्त्रीनगर भागात राहतो. त्याच्याकडं सोलापूरचं तिकीट आढळून आलं. पण, अन्य कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत. आरोपीच्या विरोधात मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं दिलेल्या माहितीची पडताळणी सुरु असून याबाबत सोलापूरमधील पोलीस स्टेशनशीही संपर्क साधला असल्याचं डुकले यांनी स्पष्ट केले. आरोपीला अटक झाली असली तरी भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे कल्याणमध्ये खळबळ माजली आहे.