संघाच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्याचा राजीनामा, रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप; मशाल हाती घेण्याचे संकेत
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, तीन वेळचे नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देत जर उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून मानसन्मान मिळाला आणि विकास निधी दिला तर आम्ही मशाल हाती घेऊ, असे उघडपणे विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी सांगितले.
विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत घेतला आहे. या निर्णयामागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. डोंबिवलीचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचे विकास म्हात्रे यांनी बोलताना सांगितले. तसेच आमच्या आजूबाजूच्या वार्डांना भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. सत्तेत असूनही निधी मिळत नसेल तर सत्तापक्षात राहून काय करताय, असा नागरिकच मला विचारत आहेत. त्यामुळे विकासकामे अडकली आहेत म्हणून आम्ही नाईलाजाने हा निर्णय घेतला, असे विकास म्हात्रे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डोंबिवली दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मानसन्मान आणि विकास निधी मिळत असेल तर आम्ही मशाल हाती घेऊ, असेही विकास म्हात्रे यांनी सांगितले. डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानला जातो. भारतीय जनता पक्ष आणि संघाचे स्वयंसेवक एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात. संघाचे नेटवर्क मोठे असल्यामुळे भाजपची डोंबिवलीत मोठी शक्ती आहे. असे असतानाही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे.