गुन्हा नोंदवू नये म्हणून १० हजारांची लाच घेताना बासंबा पोलिस ठाण्याचा जमादार आणि गृहरक्षक दलाचा जवान रंगेहात अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
हिंगोली : अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बासंबा पोलिस ठाण्याच्या जमादारासह गृहरक्षक दलाच्या जवानाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने इसापूर रमना (तांडा) येथे रंगेहात अटक केली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांवर अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर जमादार प्रविण राठोड याने १० हजार रुपयांची लाच आणि दरमहा दोन हजार रुपयांचा हप्त्याची मागणी केली होती. राठोड याने गृहरक्षक दलातील जवान दत्ता दराडे याच्या माध्यमातून ही लाच मागितली.
तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाचे उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता दिनकर, जमादार भगवान मंडलीक, गजानन पवार, राजाराम फुफाटे, विजय शुक्ला, विनोद पुंडगे, रवी वरणे यांच्या पथकाने इसापूर रमना रोडवर बुधवारी (ता. २५) रात्री सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे दराडे याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. यानंतर जमादार राठोड यालाही अटक करण्यात आली. गुरुवारी (ता. २६) पहाटे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक विकास घनवट करत आहेत.