सिगारेट उधार न दिल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणाकडून ५३ वर्षीय दुकानदार महिलेचा खून; पाच दिवसांच्या तपासानंतर आरोपी अटकेत
योगेश पांडे / वार्ताहर
चंद्रपूर – एका अल्पवयीन तरुणाने केवळ सिगारेट उधार न दिल्याच्या कारणावरून एका ५३ वर्षीय महिलेला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राजूरा शहरातील रमाई नगर परिसरात घडली असून, पाच दिवसांच्या कसोशीनंतर राजुरा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कविता रायपूरे (वय ५३) यांचे रमाई नगर येथे किराणा दुकान होते. पाच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणाने त्यांच्या दुकानात येऊन सिगारेटची मागणी केली होती. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने उधारीवर सिगारेट देण्याची विनंती केली. कविता रायपूरे यांनी सिगारेट उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन तरुणाने त्या दिवशीच रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कविता रायपूरे यांचे घर रिकामे असल्याची खात्री करून, सुरक्षा भिंतीवरून उडी मारत घरात प्रवेश केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून कवितांची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान जवळपास ४० संशयितांची चौकशी झाली, मात्र काही हात लागले नाही. अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुरावे दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. “सिगारेट उधार न दिल्याचा राग मनात धरूनच आपण हे कृत्य केलं,” असे त्याने सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर किशोर न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.