मोटरमनच्या कॅबिनमध्ये ‘तिसरा डोळा’; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सर्व हालचालींवर असणार नजर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई लोकलचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी रेल्वे प्रशासन वेळोवेळी अनेक बदल सेवांमध्ये करत असते. मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता सुरक्षेच्या दृष्टीने मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु केले आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यास वेगाने सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या २५ लोकलमध्ये ५० तर पश्चिम रेल्वेच्या २६ लोकलमध्ये ५२ सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमन्सचा या यंत्रणेला विरोध होता. मात्र मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या कामाला वेग आला आहे.
मध्य रेल्वेवर १६८ ट्रेनमध्ये ३३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असणार आहे. तर सध्या २५ ट्रेनमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेकर ११५ ट्रेनमध्ये २३० कॅमेऱ्यांची आवश्यकता असणार आहेत. सध्या २६ ट्रेनमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आली आहेत. प्रत्येक ट्रेनसाठी सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहेत. रेल्वे अपघातानंतर तो अपघात नेमका कसा झालं याची माहिती मोटरमन किंवा प्रत्यक्षदर्शीकडून मिळते. यासाठी तांत्रिक पुरावा रेल्वेकडे असणे देखील गरजेचे आहे. रेल्वेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अपघाताच्या घटनांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. अपघाताला नेमकं जबाबदार कोण हे ठरवणे देखील सीसीटीव्हीमुळे सोपं होईल.