सांगलीतील धक्कादायक घटना: ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक पित्याची मुलगी मारहाणीत ठार

Spread the love

सांगलीतील धक्कादायक घटना: ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक पित्याची मुलगी मारहाणीत ठार

पोलीस महानगर नेटवर्क 

आटपाडी, सांगली – एक अंगावर शहारे आणणारी आणि मन सुन्न करणारी घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे घडली आहे. ‘नीट’ परीक्षेतील कमी गुणांच्या रागातून एका वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने इतकी बेदम मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आरोपी स्वतः एका माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे.

नेमकं काय घडलं?

मृत मुलगी साधना भोसले ही बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं. दहावीत तिने ९५% गुण मिळवून उत्तम यशही मिळवलं होतं. मात्र, अलीकडेच झालेल्या नीट चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिचे वडील धोंडीराम भोसले हे संतापले.

शुक्रवारी रात्री साधना घरी असताना धोंडीराम भोसले यांनी तिला जात्याच्या लाकडी खुंट्याने जबरदस्त मारहाण केली. त्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत असतानाही तिला त्वरित रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी वडील दुसऱ्या दिवशी योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी आल्यानंतर त्यांना साधना अर्धमेला अवस्थेत आढळली. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

आईची फिर्याद, वडिलांना अटक

या प्रकाराची माहिती साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलिसांनी धोंडीराम भोसले यांच्याविरुद्ध कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

समाजमनावर प्रश्न

या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे. पालकांच्या अपार अपेक्षा, अभ्यासावरचा ताण, आणि अपयश न पचवता येणारी वृत्ती यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि कधी कधी शारीरिक अत्याचार होतात. साधनासारख्या हुशार, स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीचा जीव केवळ काही गुणांमुळे गेला, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon