धक्कादायक ! कारसाठी माहेरावरून १० लाख रुपये आण, अन्यथा त्रास, बीडमध्ये पोलिसासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

धक्कादायक ! कारसाठी माहेरावरून १० लाख रुपये आण, अन्यथा त्रास, बीडमध्ये पोलिसासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

बीड – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हुंडाबळीसंदर्भातील घटना पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः पोलीस असलेल्या पतीनेच आपल्या पत्नीचा १० लाख रुपयांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला. या प्रकरणात पत्नीच्या तक्रारीनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत पत्नी रेणुका विनोद कुटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा छळ २०२१ पासून सुरु होता. पती विनोद कुटे हे बीड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सध्या पोलीस मुख्यालयात पदस्थ आहेत. त्यांनी आपल्या पत्नीला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता.

या आर्थिक मागणीस नकार दिल्यामुळे रेणुका यांना सतत शिवीगाळ, मारहाण आणि धमक्या दिल्या गेल्या. या छळात इतर नातेवाईकांचाही सहभाग होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, विनोद कुटे यांच्यासह सीता कुटे, रोहिणी गाडे आणि गोविंद गाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली आहे. सध्या तपास सुरु असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अजूनही ताजे असतानाच, बीडमधील हा नवा प्रकार पुन्हा एकदा समाजातील हुंडा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर वास्तवाची जाणीव करून देतो. या घटनांमुळे हुंडा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत असून, समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon