१५ वर्षांपासून फरार आरोपी अखेर गजाआड; अंटॉप हिल पोलिसांची शिताफीने कारवाई
मुंबई – तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर अंटॉप हिल पोलिसांच्या शिताफीने हाती लागला आहे. गुन्हा क्रमांक ९७/२०१० अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ (जखमी करणे), ५०६(२) (गंभीर धमकी), ५०४ (जाणीवपूर्वक अपमान), आणि ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी अभिषेक उर्फ सनी प्रकाश दारोले (वय ४४, रा. सायन कोळीवाडा) याला अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०१० पासून फरार होता. त्याचा तपास पुन्हा उघडत नातेवाईक, मित्र, ओळखीचे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. तपासादरम्यान आरोपी कर्जत येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली, मात्र तो तेथूनही सटकला. मात्र नंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी त्याच्या मावशी स्वाती चोरघे यांची तब्येत खालावल्याने त्यांना भेटण्यासाठी येणार होता. ही संधी साधत पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. आधारकार्डद्वारे त्याची ओळख पटवून त्यास अटक करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) सौ. रागासुधा आर., सह पोलीस आयुक्त श्री. शैलेंद्र धिवार (सायन विभाग) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. केशवकुमार कसार, पोनि. गोपाळ भोसले (गुन्हे), पोनि. समीर कांबळे (कार्यवाही व सूचना), पोउनि. अरफात सिद्दीकी (तडीपार अधिकारी), पोह. गोरख सानप, पोह. शिवाजी दहिफळे, पोशि. अनिल राठोड
या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंटॉप हिल पोलिसांच्या तपास कौशल्याचे आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.