पनवेलमध्ये बेकायदेशीर जमीन हडपप्रकरणी १.२४ कोटी रुपयांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

पनवेलमध्ये बेकायदेशीर जमीन हडपप्रकरणी १.२४ कोटी रुपयांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – वाघाचीवाडी परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे हस्तगत करून तब्बल १.२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींसह त्यांचे इतर साथीदारांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही फसवणूक ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२४ या कालावधीत घडली असून, पीडित संजय चंद्रकांत महागावकर (वय ६९) यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बनावट कागदपत्रांची फसवणूक

तक्रारीनुसार, महागावकर व त्यांच्या मयत आई निला चंद्रकांत महागावकर यांच्या नावे असलेली वाघाची वाडी येथील गट क्र. ८/३/५८ मधील प्लॉट क्र. १३ व सब प्लॉट नं. २ या ०.११ हेक्टर क्षेत्रफळाच्या जमिनीवर आरोपींनी डोळे ठेवले.

प्रभाकर बंडू नाईक (आरोपी क्र. १) आणि अंबावी रणछोड पटेल (आरोपी क्र. २) यांनी संगनमताने ही मालमत्ता बेकायदेशीर मार्गाने आपल्या नावावर करून घेतली. त्यांनी बनावट ओळखपत्रे, निवडणूक आयोगाचे खोटे दस्तऐवज, खरेदीखत आणि खोटी सह्या वापरून मालकी हक्क प्राप्त केला आणि ती जमीन तिसऱ्या व्यक्तीस विकून आर्थिक फायदा उचलला.

आरोपी अद्याप फरार

या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. मात्र पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon