जुगाराच्या नादामुळे आयटी विद्यार्थ्याचे चक्र फिरले अनं सुरू केली चोरी; पोलीस तपासात समोर आल्या खळबळजनक गोष्टी
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – महाराष्ट्रातील नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आरोपीला अटक केली. हा आरोपी साधासुधा चोर नसून, त्याची कहाणी भुवया उंचवायला लावणारी आहे. आशिष रेडीमल्ला (एम. टेक) याने पुणे आणि नागपूरमधील आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या केल्या. पण जुगाराचं व्यसन लागल्यामुळे गुन्हेगारीच्या जगात आला. यानंतर आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तरूणानं अनेक गुन्हे केल्याचं उघडकीस आलंय. धंतोली परिसरातील शीतल चिंतलवार यांच्या घरात झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातील आशिषला अटक करण्यात आली. पोलीस तपासात समोर आले की, आशिषने जुगारात तब्बल २३ लाख रुपये गमावले होते. कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला.
नागपूरच्या छत्रपती नगर परिसरात नोकरीसाठी तो राहिलेला होता. त्यामुळे त्याला तिथल्या घरांची माहिती होती. त्यानं सुनसान बंगल्यांची पाहणी करून आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केली आहे. चोरीसाठी तो चंद्रपूरहून बसने नागपूरला यायचा. आधी रिकाम्या घरांचा शोध घ्यायचा आणि नंतर चोरी करायचा. आरोपीने धंतोलीसह नागपूरच्या इतर भागातही चोरी केल्याची कबुली दिली आहे. धंतोली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिक मिर्झापुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितलं की, आशिषने पैसे मिळवण्यासाठी चोरी केल्याचं कबूल केलं असून, नागपूरच्या अनेक भागांत त्याने चोऱ्या केल्या आहेत.