कैद्यांचे ‘मेडिकल टुरिझम’ बंद करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश

Spread the love

कैद्यांचे ‘मेडिकल टुरिझम’ बंद करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश

पुणे – ‘येरवडा कारागृहातील कैदी उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल होतात. शिक्षा न झालेले कैदी (न्यायाधीन बंदी), तसेच शिक्षा झालेले काही कैदी उपचारांच्या नावाखाली गैरप्रकार करतात. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. ससूनमधील कैद्यांचे ‘मेडिकल टुरिझम’ बंद करण्यात येणार आहे,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिला. अत्यावश्यक आणि तातडीचे वैद्यकीय उपचार कैद्यांवर व्हावेत, अशी सूचना त्यांनी केली. ससून रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालायात पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात नवीन पोलीस चौकीचे कामकाज मंगळवारपासून सुरू झाले. या वेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे, स्मार्तना पाटील, ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लप्पा जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता कीर्ती कुंजीर या वेळी उपस्थित होते.

‘ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली काही सराइत गुन्हेगार दीर्घ काळ वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही आरोपींना उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर पसार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. उपचारांच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असतात. सराइतांना भेटण्यासाठी नातेवाईक आणि साथीदार रुग्णालयात येतात. उपचारांच्या नावाखाली ससूनमधील ‘मेडिकल टुरिझम’ बंद करा. तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ससूनमध्ये कैद्यांना दाखल करण्यात यावे. रुग्णालयाच्या आवारात पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर गैरप्रकारांना आळा बसणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञांशी वाद घालणे, त्यांना धक्काबुक्की करणे, रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्याच्या घटना घडल्यास त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. रुग्णालयाच्या आवारात कोणी दारू पिणारा असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल, आत्महत्या, अकस्मात मृत्यू, अपघाती मृत्यू अशा प्रकरणातील कागदपत्रे (मेडिको लीगल रिपोर्ट) या चौकीमार्फत संबंधित पोलीस ठाण्यांना त्वरित उपलब्ध करुन दिले जाणार आहेत,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले. आमदार सुनील कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ससूनमध्ये चौकी सुरू झाल्यानंतर निश्चित फायदा होणार आहे. रुग्णालयातील गोंधळ, गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होणार आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

चौकीच्या कामकाजाची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर

‘ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. परगावाहून येथे नागरिक उपचारांसाठी येतात. रुग्णालयाच्या आवारात गर्दी असते. डाॅक्टर, रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था विचारात घेतल्यास ससूनमधील पोलीस चौकी महत्त्वाची ठरणार आहे. या चौकीत पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. चौकीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon