लुटेरी दुल्हनचा सापळा : मॅटरिमनी साईटवरून लग्न, नंतर फसवणूक!

Spread the love

लुटेरी दुल्हनचा सापळा : मॅटरिमनी साईटवरून लग्न, नंतर फसवणूक!

पोलीस महानगर नेटवर्क 

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागात लग्नाचं वय निघून गेल्यानंतर नातेवाईक आणि समाजामध्ये जुळवणी करणं कठीण ठरतं. अशा परिस्थितीत अनेक जण मॅटरिमनी (वधू-वर सूचक) संकेतस्थळांचा आधार घेतात. मात्र, ही आधुनिक जुळवणी पद्धत आता फसवणुकीचे नवे हत्यार ठरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

फसवणुकीचा नवा ट्रेंड – लुटेरी दुल्हन

अलीकडच्या काळात काही टोळ्या अशा संकेतस्थळांवर सक्रिय असून, दीर्घकाळापासून विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करतात. या टोळ्या मुख्यतः पुनर्विवाह इच्छुक किंवा वयाने थोडे मोठे असलेल्या पुरुषांवर लक्ष केंद्रित करतात.

या फसवणुकीचं एक ठराविक पॅटर्न असतो:

मुलीविषयी उच्चशिक्षित, उच्चपदस्थ असल्याची बतावणी केली जाते.

थोड्याच संवादात लग्नाच्या गोष्टी पुढे नेल्या जातात.

संबंधित घरच्यांना बोलण्यातून प्रभावित केलं जातं, चौकशीस फारसा वाव राहत नाही.

लग्न तातडीनं ठरतं आणि थाटामाटात पार पडतं.

काही दिवसात नववधू तिच्या नातेवाइकांना घेऊन दागदागिने, रोख रक्कम व इतर भेटवस्तूंंसह पसार होते.

पुनर्विवाह करणारे सर्वाधिक धोक्यात

विशेषतः पुनर्विवाह करणारे किंवा एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणारे पुरुष अधिक सहज या सापळ्यात अडकतात. त्यांचं मानसिक आणि भावनिक स्थिती ओळखून टोळ्या योजनेनुसार सगळं आखतात. महानगरांमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढले असून, ग्रामीण भागांमध्येही याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गडचिरोलीत सध्या शांतता, पण…

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांमध्ये लुटेरी दुल्हन संबंधित एकही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलिस विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन युवकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अनेकदा फसवणूक झाल्यावर बदनामीच्या भीतीने पीडित व्यक्ती तक्रार करत नाही, त्यामुळे अशा घटनांचा तपशील रेकॉर्डवर येत नाही.

सावधगिरी हाच उपाय

मॅटरिमनी साईटवर संबंध जुळवताना सखोल चौकशी करा.

स्थळ निश्चित करण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासा.

शक्य असल्यास स्थानिक माध्यमांतून किंवा ओळखीच्या लोकांतून खात्री करा.

लग्नाची घाई न करता पुरेसा वेळ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon