स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक; महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकावले
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – नागरिकांच्या विरोधानंतरही महावितरणकडून कल्याण शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या सोसायटींमध्ये जबरदस्तीने मीटर बसविण्याचा प्रयत्न केला जातो. तिथे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. काल शनिवारी कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील एका सोसायटीत विरोध धुडकावत मीटर बदलणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फटकावले आहे. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम टाकून काढता पाय घेतला. या दरम्यान शहरात स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला तर चांगलाच धडा शिकवू, असा इशारा देखील यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे
महावितरणकडून नागरिकांना स्मार्ट मीटर बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा बदल म्हणजे नागरिकांची लूट करण्याचा प्रयत्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळेच या मीटर जोडणीला जोरदार विरोध होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा योगीधाम परिसरातील कैलाश होम्स सोसायटीमध्ये काल महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू होते. यावेळी नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना विरोध केला. मात्र नागरिकांना धुडकावून देत कर्मचाऱ्यांनी मीटर बदलण्याचे काम सुरु ठेवले. यामुळे नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. युवा सेनेचे पदाधिकारी गणेश नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र कर्मचारी ऐकत नसल्याने संतापलेल्या नाईक यांनी एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावत इतर कर्मचार्यांना दटावले आहे. दरम्यान नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा रुद्रावतार पाहून कर्मचार्यांनी काढता पाय घेतला.