प्रेम त्रिकोणाच्या संशयातून तरुणाचा खून; चौघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोरेवाडा हिल परिसरात प्रेम त्रिकोणातून एका २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. मृत तरुणाची ओळख अमन गजेंद्र ध्रुववंशी (वय २०) अशी झाली असून, तो शिलाँग येथील महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. सध्या तो उन्हाळी सुट्टीसाठी नागपूरला आला होता. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आरोपींनी अमनला गोरेवाडा हिल परिसरात नेले. तेथे मुख्य आरोपी लकी मेंढेवार (वय १८) याने अमनवर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. या गुन्ह्यात लकीसोबत अभिषेक कटारिया (२५), सुलभ ठाकूर (२५) आणि एक अल्पवयीन मुलगा सामील होता.
पोलीस तपासात उघड झाले की, लकीचा काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबत वाद झाला होता आणि त्या वादानंतर ती मुलगी अमनच्या संपर्कात आली. त्यामुळे लकीने अमनवर संशय घेतला आणि त्याच्या मृत्यूची योजना आखली. रविवारी सकाळी अमन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मानकापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. त्याच वेळी आरोपींपैकी अभिषेक कटारिया पोलिसांकडे जाऊन एका मित्राने हत्या केल्याची माहिती दिली. पुढील तपासात अमनचा मृतदेह जंगलात सापडला आणि चौघांनाही ताब्यात घेण्यात आले. मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरीश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.