छत्रपती संभाजीनगरात पत्त्यांचे क्लब रडारवर, नामांकित व्यक्तींसह ७६ ‘गॅम्बलर’ गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – शहरातील बड्या पत्त्यांच्या क्लबवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ७६ जुगाऱ्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र पथकांनी शुक्रवारी रात्री एकाचवेळी चिश्तिया चौक व पडेगाव येथे धाड टाकत लाखो रुपयांची रोकड, मोबाइल आणि वाहने जप्त केली आहेत. या कारवाईने शहरातील पत्त्याच्या अड्ड्यांवर धसका भरला आहे.
चिश्तिया चौकातील मोठा अड्डा उध्वस्त
शहरातील चिश्तिया चौक परिसरात फिझा हॉटेलच्या इमारतीच्या दोनवरच्या मजल्यांवर अनेक वर्षांपासून प्रवीण जैस्वाल नावाच्या व्यक्तीचा पत्त्याचा क्लब सुरू होता. या क्लबवर रोज शंभराच्या घरात जुगारी खेळण्यासाठी येत होते आणि २५ हून अधिक टेबलांवरून कोट्यवधींची उलाढाल होत होती.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक विनायक शेळके, संदीप सोळुंके, विशाल बोडखे व संदीप शिंदे आदींच्या पथकाने छापा टाकत क्लबमधून ७६ जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसह राजकीय नेत्यांचे सहायक व अन्य नामवंत व्यक्तींचाही समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत २५ हून अधिक टेबलांवरील लाखो रुपयांची रोकड मोजण्याचे काम सुरू होते. क्लबमधील ८ कर्मचाऱ्यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे.
पडेगाव अड्ड्यावरही धाड
त्याचवेळी दुसऱ्या पथकाने पडेगाव परिसरातील एका गुप्त जुगार अड्ड्यावरही छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पोलिसांनी सुमारे ८४ हजार रुपये रोकड, १० लाख रुपये किमतीचे मोबाइल फोन व वाहने जप्त केली. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दोन्ही ठिकाणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैस्वालसह इतर आरोपींवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पोलीस दलात फेरबदलांनंतर मोठी मोहीम
शहर पोलीस दलात अलीकडेच झालेले बदल आणि नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती यानंतर अनेक काळापासून दुर्लक्षित असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून पोलिसांच्या धाडसी पावलांचे स्वागत करण्यात येत आहे.