तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाहीतर भरावा लागेल दंड; मध्य रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम सोमवारपासून सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – उपनगरी प्रवासात फर्स्ट क्लास डब्यांमधील अनधिकृत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींवर मध्य रेल्वेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (१७ जून) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाणार असून, कोणताही प्रवासी तिकीट किंवा वैध पासशिवाय प्रथम श्रेणी डब्यात सापडल्यास त्याच्यावर तातडीने दंड आकारण्यात येणार आहे.
विशेष पथक तैनात
या मोहिमेसाठी मध्य रेल्वेचे विशेष तिकीट तपासनी पथक आणि रेल्वे सुरक्षा दल संयुक्तरित्या कारवाई करणार आहेत. गर्दीच्या वेळेत विशेषतः सकाळच्या व संध्याकाळच्या प्रवासात या पथकांना प्रत्येक फर्स्ट क्लास डब्यात संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात केले जाणार आहे. तपासणीदरम्यान अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांना तात्काळ दंड आकारण्यात येईल. दंड भरण्यास नकार दिल्यास अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तिकीट तपासनी अधिकाऱ्यांकडे सोपवले जाईल.
प्रथम श्रेणीतील गैरप्रवेश रोखण्याचा प्रयत्न
प्रथम श्रेणी डब्यांमध्ये दुसऱ्या दर्जाच्या प्रवाशांकडून अनधिकृत प्रवेश ही वारंवार होणारी तक्रार आहे. गर्दीच्या वेळेत, विशेषतः कार्यालयीन वेळात अनेक प्रवासी वेळेवर पोहोचण्यासाठी फर्स्ट क्लास डब्यांचा गैरवापर करतात. त्यामुळे नियमित आणि वैध तिकीटधारक प्रवाशांचा त्रास वाढतो. यामुळेच मध्य रेल्वेने ही ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट
प्रथम श्रेणी प्रवाशांचे हक्क सुरक्षित ठेवणे
उपनगरी रेल्वे प्रवासात भाडे प्रामाणिकतेला चालना देणे
सातत्यपूर्ण तपासणीद्वारे अनधिकृत प्रवासास आळा घालणे
प्रवाशांना आवाहन
मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी वैध तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा, तसेच तपासणी पथकाला सहकार्य करून प्रवास सुखकर व सुरक्षित ठेवावा. ही मोहीम पूर्वी यशस्वीपणे राबवलेल्या एसी लोकल तिकीट तपासणी उपक्रमाच्या यशस्वी अनुभवावर आधारित असून, नागरिकांच्या प्रतिसादावर पुढील दिशा ठरणार आहे.