डंपरची धडक; चौघांचा मृत्यू, एकाची स्थिती चिंताजनक
रवि निषाद / मुंबई
मुंबईच्या गोवंडी येथील शिवाजीनगर भागात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात शनिवारी, १४ जून रोजी दुपारी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर घडला. डंपर चालकाच्या बेफिकीरपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
अपघातात मृत झालेल्यांमध्ये नूर मोहम्मद गलेन (४२), आर्यन मोहम्मद गलेन (११), मोहम्मद हुसेन खान (११) आणि अब्दुल गनी खान (९) यांचा समावेश आहे. एक जण सध्या गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही दिशेने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन जमावाला शांत केले.
डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताच्या अधिक तपासासाठी कारवाई सुरू आहे.