मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार यांच्या समोरच दोन गटांत हाणामारी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना, मुंबई भाजपामध्ये अंतर्गत वाद समोर आला आहे. कांदिवलीच्या जानुपाडा परिसरात शुक्रवारी झालेल्या एका बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली. विशेष म्हणजे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीतच हा सर्व प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जानुपाडा येथील नागरिक सध्या वनजमिनीच्या मालकीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार हे स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तेथे पोहोचले होते. मात्र, बैठकीपूर्वीच भाजपाच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि तो हाणामारीपर्यंत गेला.
शेलार कारमधून उतरताच दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. जोरदार शाब्दिक चकमकीनंतर हातघाई झाली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर एक गटातील पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा आमच्या पक्षांतर्गत वाद आहे. वरिष्ठ याची योग्य ती दखल घेतील. आम्ही सध्या मेडिकल तपासणीसाठी जात आहोत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.” घटनेची दखल घेत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने संबंधितांना शांतता राखण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या वादामुळे भाजपाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बाब पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.