राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणार – मनोज जरांगे पाटील

Spread the love

राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणार – मनोज जरांगे पाटील

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती – माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळी पोहचून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कडू यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. शेतकरी संकटात आहेत. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. पण, उपोषण करणे, हे सहजसोपे नसते, हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगतो. बच्चू कडू यांनी जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी अंत्ययात्रा हा शब्द वापरला आहे. हे फार गंभीर आहे. बच्चू कडू यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्‍य कराव्यात अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

मनोज जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात कुणी मराठा, कुणी ओबीसी नाही. जात आम्ही घरी ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र आले पाहिजे. आता सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी तातडीने बैठक बोलावून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि एक दिवस ठरवून संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक द्यावी. आम्ही वाहनाचे एकही चाक हलू देणार नाही. निर्णयक्षमता आमच्यात आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही सर्व जण एकत्र येऊ, पक्ष बाजूला ठेवू. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत. आता शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय बाजूला हटणार नाही. मनोज जरांगे म्हणाले, आता संपूर्ण राज्यात उठाव झाला पाहिजे. बच्चू कडू खमक्या आहे. मी माझी ताकद बच्चू कडूंच्या मागे उभी करण्यास तयार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. मी केवळ भाषणबाजी करीत नाही. मराठा, ओबीसी हा विषय आम्ही या आंदोलनाच्या वेळी बाजूला ठेवला आहे. कुणी इथे जात आणू नये, पक्ष आणू नये. सर्वांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई उभारली पाहिजेत.

बच्चू कडू यांनी यावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले. कडू म्हणाले, दर दिवशी २० ते २५ शेतकरी आत्महत्या होतात. कष्टाने पिकवलेले सोयाबीन अवघ्या साडेतीन हजार रुपयांमध्ये विकावे लागते, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनाला किती वेदना होत असतील, हे समजून घ्यायला हवे. यावेळी ज्येष्ठ नेते गिरीश गांधी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon