एचडीएफसी बँकेच्या सीईओविरोधात फसवणुकीचा गुन्हा; एलकेएमएम ट्रस्टकडून गंभीर आरोप

Spread the love

एचडीएफसी बँकेच्या सीईओविरोधात फसवणुकीचा गुन्हा; एलकेएमएम ट्रस्टकडून गंभीर आरोप

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशिधर जगदीशन यांच्यावर फसवणूक व विश्वासघाताचे गंभीर आरोप झाले असून वांद्रे पोलिसांनी त्यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे (एलकेएमएम ट्रस्ट) कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ट्रस्टचे सात माजी विश्वस्तही आरोपी आहेत. गुन्हा दाखल करण्याचे आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. लीलावती रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गेल्या काही वर्षांपासून दोन गटांमध्ये वाद सुरू असून याआधीही पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, बड्या खाजगी बँकेच्या सीईओविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गंभीर आरोप, ठोस पुरावे

प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा वाद केवळ अंतर्गत मतभेदाचा नसून धर्मादाय संस्थेच्या हिताविरोधातील गंभीर फसवणूक आहे. त्यांनी असा आरोप केला की शशिधर जगदीशन यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत खोट्या माहितीच्या आधारे ट्रस्टच्या हितधारकांना न्यायपासून दूर ठेवले. मेहता यांच्या मते, हा गुन्हा केवळ तोंडी आरोपांवर आधारित नसून, त्यात हस्तलिखित डायऱ्या, ईमेल्स, रोख नोंदी, सीएसआर निधीचा गैरवापर, बनावट देयक पावत्या आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे पुरावे समाविष्ट आहेत. ट्रस्टच्या खात्यातील २५ कोटी रुपये बँकेत ठेवल्याची कोणतीही अधिकृत मंजुरी नसतानाही ती रक्कम भरली गेली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

लाच देणगी म्हणून दाखवली

गुन्ह्यात नमूद केल्यानुसार, २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात माजी विश्वस्तांनी जगदीशन यांना दिल्याचे जप्त डायरीत नमूद आहे. याशिवाय १.५ कोटी रुपयांची रक्कम सीएसआर देणगी म्हणून दाखवून वरिष्ठ डॉक्टरांकडून महत्त्वाचे दस्तावेज लपवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात आला आहे.

जगदीशन यांच्यावर बँक पदाचा गैरवापर केल्याचा ठपका

मेहता यांनी सांगितले की, जगदीशन यांनी बँकेतील सर्वोच्च पदाचा दुरुपयोग करत निष्कासित विश्वस्त गटाचे संरक्षण केले आणि ट्रस्टच्या कायदेशीर हितधारकांविरोधात बनावट गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहही उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट केले की हा गुन्हा बँकेविरोधात नसून फक्त सीईओ जगदीशन यांच्याविरोधात आहे.

एचडीएफसी बँकेचा बचाव

दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्यांनी या आरोपांना पूर्णतः निराधार आणि द्वेषपूर्ण असे म्हणत फेटाळले. त्यांनी सांगितले की, “६५ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीला अडथळा आणण्यासाठी हा कट रचला गेला आहे. ट्रस्टचा कर्जबुडवेपणा स्पष्ट झाल्यानंतर त्याच कुटुंबाने बँकेवर दबाव आणण्यासाठी अशा पद्धतीने खटले दाखल केले आहेत,” असा आरोप बँकेने केला.

सदर प्रकरणामुळे एकीकडे धर्मादाय संस्थांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातील जबाबदारीबाबतही व्यापक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील तपासात सत्य काय ते स्पष्ट होईल असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon