१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत दहिसर आणि माटुंगा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी
द्वितीय’ क्रमांकाने सन्मानित; झोन ४, ६ आणि १२ ची दुहेरी यशस्वी घोडदौड
मुंबई – मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ७ जानेवारी २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम (टप्पा-२) राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश पोलीस ठाण्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, कार्यक्षमता, जनसंपर्क, व्यवस्थापन व कार्यालयीन पातळीवरील सुधारणा घडवून आणणे हा होता. या विशेष मोहिमेदरम्यान, झोन ४, ६ आणि १२ हे संपूर्ण मुंबईतील एकमेव असे झोन ठरले, जिथे पोलीस ठाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोघांचीही उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड करण्यात आली. या यशस्वी यादीत माटुंगा पोलीस ठाणे (झोन ४), दहिसर पोलीस ठाणे (झोन १२), सायन एसीपी विभाग तसेच झोन ६ मधील आणखी एक पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, माटुंगा आणि दहिसर पोलीस ठाण्याने या संपूर्ण मोहिमेदरम्यान उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कामगिरी करत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘द्वितीय क्रमांक’ पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ एका पोलीस ठाण्याचा नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे द्योतक ठरतो. या कामगिरीमुळे माटुंगा पोलीस ठाण्याचे संपूर्ण बृहन्मुंबई पोलीस दलात नावलौकिक वाढला असून, भविष्यातही अशीच कामगिरी करून जनतेच्या सुरक्षेसाठी आणि विश्वासासाठी सदैव तत्पर राहण्याची अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे.