विनोबा भावे नगर पोलिसांची यशस्वी कारवाई; मोटार वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; तीन गुन्हे उघड, १.७० लाखांच्या वाहनांची जप्ती
मुंबई – कुर्ला येथे दि. २८ मे २०२५ रोजी रात्री सुमारे ९ ते १० वाजेच्या सुमारास दीपक कुमार साहू (वय २२), हे रिक्षाचालक आपली रिक्षा एचडीआयएल परिसर, कुर्ला पश्चिमेतील बिल्डिंग नं. १० समोर पार्क करून गेले होते. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की, अज्ञात चोरट्याने रिक्षा चोरी केली आहे. यावरून विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराच्या मदतीने मोहम्मद सगीर अब्दुल मजीद सिद्दिकी उर्फ मॅगी (वय २७) या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेली रिक्षा तसेच दोन मोटारसायकली अशा एकूण तीन वाहनांची जप्ती करण्यात आली. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १,७०,०००/- रुपये इतकी आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त श्री. विक्रम देशमाने, उप आयुक्त श्री. गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र श्रीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत पोउनि. अमर चेडे, पो.ह. गांगुर्डे, गवारे, सांगळे, महाजन, विशे आणि उगले यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.