बीकेसी’च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती

Spread the love

बीकेसी’च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईचं कॉर्पोरेट हब असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये सध्या सापांचा सुळसुळाट झाला आहे. बीकेसीच्या सेबी भवन परिसरात बुधवार ते शनिवार या कालावधीत अजगराची एकूण १२ पिल्लं आढळून आली आहेत. यातील एका पिल्लाचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाल्याने साप उष्णतेसाठी मानवी वस्तीत येत आहेत. बीकेसीच्या सेबी भवनात अजगराची पिल्लं रस्त्याच्या कडेला आढळून आली. त्यानंतर सर्पमित्र संस्थेला बोलावण्यात आलं. सर्पमित्र अतुल कांबळे आणि माहीम पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सर्पमित्र पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अजगराच्या पिल्लांची सुटका करण्यात आली. सेबी भवनबाहेर फूटपाथवर अजगराचं पहिलं पिल्लू आढळून आलं. त्याची सुटका केल्यानंतर सर्पमित्रांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केल्यानंतर रस्त्यावर एका अजगराच्या पिल्लाचा गाडी खाली आल्याने मृत्यू झाल्याचं दिसून आलं.

सेबी भवनाच्या फूटपाथच्याच भागात एका दगडाखाली दुसरा, गटाराच्या चेंबरमध्ये तिसरा तर सेबी भवनासमोरील गार्डनच्या लाद्यांमध्ये चौथा अशी पाच पिल्लं सापडली. पुढे मंगळवारी पुन्हा ६ आणि बुधवारी आणखी एक पिल्लू आढळलं. या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात अजगराची पिल्लं आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्पमित्रांनी देखील परिसरातील रहिवाशांसाठी काही सूचना दिल्या आहेत. रहिवाशांनी या भागात रस्त्यावर वाहनं उभी करू नयेत किंवा अडचणीच्या ठिकाणी वाहनं उभी करू नयेत. तसेच कोणत्याही सापाला पकडण्यासाठी जाऊ नये. साप आढळल्यास सर्पमित्रांना किंवा वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असं आवाहन सर्पमित्र अतुल कांबळे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon