गुगलवर पुरातन मंदिरं शोधून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १२३८ ग्रॅम चांदी आणि ६६ किलोच्या तांबे-पितळाच्या मूर्ती जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली होती. या प्रकरणातील मोठा तपास उलगडत नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक उच्चशिक्षित अभियंता आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष बाब म्हणजे ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत पुरातन मंदिरांची माहिती गोळा करत होती आणि नंतर याच मंदिरांमध्ये चोरी करत होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींपैकी एक सुयोग दवंगे हा मॅकेनिकल अभियंता असून, तो एक सराईत गुन्हेगार आहे. तो आणि त्याच्या साथीदारांनी गूगल आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरून राज्यातील विविध पुरातन मंदिरांची माहिती शोधली. यानंतर रात्रीच्या वेळेस हायड्रॉलिक कटरसारख्या यंत्रसामुग्रीचा वापर करत कुलूप तोडून चोरी केली जात होती. या टोळीने सिन्नर, लासलगाव, निफाड आणि वाडीवऱ्हे परिसरातील एकूण ७ मंदिरांमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी टोळीकडून तब्बल ६६ किलो वजनाच्या तांब्या-पितळाच्या मूर्ती, घंटा व इतर धार्मिक वस्तू, तसेच १२३८ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे.
घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संशयितांचा शोध घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण एमआयडीसी येथून सुयोग दवंगे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे आणि अनिकेत अनिल कदम ही नावे पुढे आली. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, पुढील चौकशीत संदीप किसन साबळे आणि दिपक विलास पाटेकर यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सध्या हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.