शहापूरात ह्रदय हेलावणारी घटना ! सर्पदंशाने १९ वर्षीय इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
शहापूर – मुंबईपासून जवळच असलेल्या शहापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हा भाग दुर्गम आहे. या ठिकाणी अनेक वेळा सर्प दंशाच्या घटना घडत असतात. मात्र त्यावर साधे उपचारही इथल्या सरकारी रुग्णालयात मिळत नाही ही शोकांतीका आहे. त्यामुळे अनेक गरिब आणि निर्दोष लोकांना आपली जीव गमवावे लागत आहेत. हे जीव गेल्यानंतर तरी सरकारला जाग येईल असं वाटते, पण त्याची काही काळजीच सरकारला नाही अशीच म्हणण्याची वेळ परत एकदा आली आहे. उपचारा अभावी एका १९ तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे ती इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. शहापूर तालुक्यातील आल्याणी गावात राणी हरिश्चंद्र निमसे ही तरुणी राहाते. तिचे वय १९ वर्षे आहे. ती इंजिनिअरींचे शिक्षण घेती. राणीला बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास झोपेत असताना मण्यार या जातीचा साप चावला. हा साप अत्यंत विषारी असतो. साप चावल्याचं समजल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला तातडीने शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण आयसीयू व इतर सोईसुविधा तिथे नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तीला ठाण्याला घेवून जाण्यासाठी सांगितले.
राणीला ठाण्याला नेण्या शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे तिच्या वडीलांनी तिला तातडीने ठाण्यासा हलवण्याचा निर्णय घेतला. पण ठाण्याला पोहोचेपर्यंत तिचा वाटेतच मृत्यू झाला. या मृत्यूनंतर शहापूर तालुक्यातील आणखी किती जणांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार आहे अशा प्रश्न आता स्थानिक उपस्थित करत आहेत. शहापूर तालुक्यातील रूग्णालयात कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याच आता आरोप होत आहे. दुर्गम असलेल्या या तालुक्याला कुणी वाली आहे का असा प्रश्नही स्थानिक करत आहेत.