शिर्डीत अवैध वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या दोन ठिकाणी पोलीसांचा छापा; दोन पुरुष आणि चार महिलांसह सहा जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
शिर्डी – शिर्डीमध्ये दोन ठिकाणी हॉटेलमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि तेथे मंगळवारी संध्याकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोन आंबट शौकीन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच हॉटेल चालकांवरही कारवाई होणार असल्याची माहिती डीवायएसपी शिरीष वमने यांनी दिली. छापा टाकताच हॉटेल चालक मात्र फरार झाला.
शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे साईबाबांच्या पवित्र शिर्डीत अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.याबद्दल माहिती देताना शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने म्हणाले, आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की शिर्डी शहरातील पालखी रोडवरील हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई या दोन्ही ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे. सदर दोन्ही ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली असता दोन आरोपी आणि चार महिला मिळून आल्या आहेत. आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.