परदेशात नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा घालत शेकडो तरुणांची फसवणूक; कंपनी विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधींचा गंडा घालत शेकडो तरुणांची फसवणूक; कंपनी विरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे /वार्ताहर 

कल्याण – परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो गरजवंता तरुणांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या प्रकार कल्याणामध्ये घडला आहे. या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करणाऱ्या स्काय सिकर्स टुरिझम या कंपनी विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होताच पोलिसांकडून कंपनीचे बँक अकाउंट सिज करण्यात आले आहे. शिवाय आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई होणार का? फसवणूक झालेल्या तरुणांचे पैसे परत मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका कंपनीने कार्यालय उघडून वृत्तपत्रात “परदेशात नोकरीची संधी” अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दुबई, सौदी अरेबिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, जपानसह मध्य आणि पूर्व देशांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. नोकरीच्या आमिषाला बळी पडून देशातील गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्र आणि कल्याण मधील शेकडो नागरिकांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी जाहिरातीमधील कंपनीकडे बायोडाटा पाठविला.

बायोडाटा पाठविल्यानंतर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले. बायोडाटा पाठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कंपनीकडून विश्वास संपादन करण्यात आला. या सर्व नागरिकांचा परदेशात जाण्यासाठी मेडिकल करण्यात आली. विसासाठी कंपनीकडून या लोकांकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुढे विसा ही संबधितांना पाठवून त्यांच्याकडून पुन्हा विमानाच्या तिकिटासाठी पैसे उकलवले गेले. मात्र पुढे काय होणार हे या लोकांना माहित नव्हते. आता परदेशात जाणार या खुशीत ते होते. एक पाऊल परदेशापासून दूर असं त्यांना वाटत होतं. परदेशातील विमानांचे तिकीट असल्याचे भासवत प्रत्येक नागरिकांकडून त्यांचा पासपोर्ट घेण्यात आला. शेकडो नागरिकांनी पैशांसह पासपोर्ट कंपनीला दिला. परदेशात जायची तयारी झाल्यानंतर शेकडो नागरिकांनी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली. मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे निदर्शनात आले.

हे पाहिल्यानंतर अनेक तरुणांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर शेकडो नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर कंपनी विरोधात शेकडो नागरिकांनी करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच, पोलिसांकडून आरोपीचे अकाउंट सीज करण्यात आले आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपी जेलबंद होतील असा आशा पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon