वसईत कोरोनाचा पहिला बळी, ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – देशात कोरोनाच्या महामारीने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून देशभरात ५११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच मुंबईमध्ये वसई- विरार परिसरात कोरोनामुळे पहिल्या पेशंटचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नायगाव मधील ४३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यातील नायगाव जवळील खोचिवडे येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय इसमाचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विनित किणी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची कोवीड चाचणी सकारात्मक आली होती. त्यातच त्याला न्युमोनिया झाल्याने सुरुवातीला त्याला वसईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठीदाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकारणी सदर रुग्ण हा नायगावमधील असला तरी वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनियाचा झाला होता आणि तो कोरोना पॉझिटिव्ह होता, त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागाल होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले असून नागरिकांनी करोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करवून घ्यावी तसेच, महापालिकेने निर्माण केलेल्या कोरोना विशेष कक्षात उपचारासाठी दाखल होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या २४ तासांत दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात २ जणांचा मृत्यू झाला आहे.