कल्याण खडकपाडा परिसरातील मुखी किशोर वाईन शॉपला स्थानिक राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारयांची विशेष मेहेरबानी
मुखी किशोर वाईन शॉपला राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांचे झुकते माप
मुखी किशोर वाईन शॉपचा मालक शासनाचा जावई लागतो का ? – महिलांचा सवाल
रात्री १२ पर्यंत वाईन शॉप चालू ठेऊन शासनाचे सर्व नियम पायदळी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते तसेच कल्याणची ओळख एक सुसंस्कृत शहर म्हणून आहे. ठाण्यातील विद्यमान पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व ठाणे राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक प्रवीण तांबे यांची एक वेगळी छाप ठाणे जिल्ह्यात असून एक कर्तबगार, प्रामाणिक व सर्वांना आपलेसे वाटणारे म्हणून त्यांची ख्याती आहे, मात्र त्याच ठाण्यातील कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डोळ्यादेखत रात्री उशिरापर्यंत मुखी किशोर वाईन शॉप चालू असते. शासनाचे सर्व नियम, निकष तोडून, मोडून मुखी किशोर वाईन शॉप रात्री उशिरापर्यंत शासकीय अधिकारयांच्या कृपाशीर्वादाने चालू असते. राज्यातील इतर सर्व वाईन शॉपला एक न्याय तर खडकपाडा येथील मुखी किशोर वाईन शॉपला वेगळा न्याय अशी दुटप्पी भूमिका शासनाची आहे का ? मुखी किशोर वाईन शॉपचा मालक शासनाचा जावई लागतो का ? असा सवाल परिसरातील महिला विचारत आहेत. शासनाच्या नाकावर टिच्चून रात्री उशिरापर्यंत बिनदिक्कत मद्य विक्री केली जाते.
कायदा बासनात गुंडाळून वाईन शॉप चालू?
परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही
मद्यधुंद टवाळखोरांकडून रस्त्यावर टिंगल व टवाळखोरी
कल्याण शहरातील इतर वाईन शॉप रात्री १०.३० वाजता बंद करीत असल्याने रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या मुखी किशोर वाईन शॉपवर नागरिकांची झुंबड उडते. या ठिकाणी टवाळखोरांच्या झुंडशाही चा त्रास देखील नागरिकांना होत असतो.
महिलांची सुरक्षा ऐरणीवर
राज्यात सध्या महिला व मुलींवर अत्याचार तसेच बलात्कार सारख्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. कल्याण शहरातील इतर वाईन शॉप वेळेत बंद होत असल्याने सध्या फक्त एकमेव मुखी किशोर वाईन शॉप हे रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने ग्राहकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. मद्यपी ग्राहकांमुळे परिसरातील व आजूबाजूच्या महिलांना रस्त्यावर फेरफटका मारण्यास धोकादायक वाटते. परिसरातील महिलांना यामुळे मोकळा श्वास घेता येत नाही. बिनदास्तपणे ये – जा करता येत नाही. राज्यातील महिलांच्या बाबतीत घडत असलेल्या घटनांमुळे दुर्दैवाने एखादी घटना या परिसरात घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादा दुर्दैवी घटना घडण्याची वाट राज्य उत्पादन शुल्क व पोलीस अधिकारी पहात आहेत का ? असा संतप्त सवाल महिला करीत आहेत.
मुखी किशोर वाईन शॉपच्या मालकाने वेळेचे बंधन पायदळी तुडवले
महाराष्ट्र शासनाची मद्य विक्री करण्यासाठी कडक नियमावली आहे. सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत वेळेचे बंधन घालून दिलेले आहे. मात्र, खडकपाडा येथील मुखी किशोर वाईन शॉप हे रात्री १२.०० वाजेपर्यंत चालू ठेऊन मद्य विक्री करतात हा सर्व गैरप्रकार दैनिक ‘पोलीस महानगर’ च्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे तसेच सदर वाईन शॉपची अनुज्ञाप्ती रद्द करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, ठाणे – कोकण विभाग उपायुक्त, ठाणे अधीक्षक व भिवंडी निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित मुखी किशोर वाईन शॉपच्या मालकावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे.