लग्नाचे वचन देऊन डोंबिवलीतील ७३ वर्षीय महिलेला ५८ लाखांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – लग्नाच्या आमिषाने डोंबिवलीत ७३ वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला ६३ वर्षाच्या व्यक्तीने आपण लग्न करू आणि पुण्यात एक घर घेऊ असे सांगून महिलेला भुलवले. यासाठी तिने तिचे घर विकले आणि आरोपीने बनावट कागदपत्रे दाखवून तिची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ६३ वर्षाच्या व्यक्तीने महिलेकडून ५७.४ लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम घेत तिची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने ‘अनुज तिवारी’ असे नाव सांगितले होते. परंतु महिलेला त्याचे खरे नाव आणि पत्ता माहीत नाही. काही दिवसातच तो माणूस तिच्या घरी राहायला आला. त्याने महिलेला लग्नाचे वचन दिले. पुण्यामध्ये घर घेऊन सोबत राहू, असेही म्हणाला. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. हळूहळू त्याने महिलेच्या पैशांचे व्यवहार स्वतःच्या हातात घेतले. महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने घेऊन एटीएम कार्डवरून पैसे काढले. महिलेला याची कल्पनाही आली नाही. त्यानंतर तो माणूस महिलेला टाळू लागला. महिलेने कपाट तपासले. तेव्हा दागिने गायब होते. त्यानंतर महिलेने विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या सर्व घटनेची माहिती विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, त्या माणसावर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.