ठाण्यात सापडले पाकिस्तानचे हेर, संवेदनशील माहिती देणाऱ्या ३ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारतामध्ये काम करत असलेलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क उघड होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाकिस्तानच्या हेरांना अटक करण्यात आली आहे. आता ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई करत ३ पाकिस्तानच्या हेरांना अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह च्या संपर्कात असल्याचा आणि भारत सरकारने प्रतिबंधित केलेली संवेदनशील व गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आले आहे की, या तरुणाचा नोव्हेंबर २०२१ मध्ये फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी गुप्तहेर एजंटशी संपर्क झाला होता. त्यानंतर, नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान, त्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गोपनीय आणि संवेदनशील प्रादेशिक माहिती पाठवली होती. या प्रकरणात तीन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे एटीएस युनिटने या सर्वांवर गुप्तचर अधिनियम १९२३ च्या कलम ३(१)(अ), ५(१) आणि बीएनएसच्या कलम १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांकडून दहशतवादाशी संबंधित पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.