गुन्हेगारीवर कडक कारवाई; कक्ष-७ च्या पथकाची उत्कृष्ट कामगिरी, ११ गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक
मुंबई – मुंबई पोलिसांच्या कक्ष-७ पथकाने दाखवलेली सतर्कता आणि चिकाटीच्या जोरावर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालू गुन्हेगारी प्रकरणात आरोपी शिवा आरमोगन शेट्टी (वय २९) याला २२ जानेवारी २०२५ रोजी जामिनावर मुक्त करण्यात आले होते. त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांसह मोक्का आर्म्स अॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हे दाखल होते. जामिनावर सुटल्यानंतर हा आरोपी आपले मूळ राहते घर सोडून पळून गेला होता. कक्ष-७च्या पथकाने त्याचा सातत्याने शोध घेतला. गोपनीय माहितीच्या आधारे, तो ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात भाड्याने घेतलेल्या खोलीत पत्नीसमवेत राहत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तांत्रिक तपास व मानवी गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर व पालघर भागात घरफोडी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून या गुन्ह्यांची खात्री करण्यात आली आणि संबंधित पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हे असल्याचे पुष्टी केली. त्यामुळे आरोपी शिवा आरमोगन शेट्टी याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खारघर पोलीस ठाणे (नवी मुंबई) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७ चे अधिकारी व अंमलदार प्र. पो.नि. श्री. आत्माजी सावंत, म.पो.नि. राजश्री बाळगी, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर व त्यांची टीम, दिपक पवार, गुरव, सुभाष मोरे, अजय बल्लाळ, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, विलास राऊत, हर्षल पाटील, प्रमोद शिंदे, विकास होनमाने, महेश सावंत, जितेंद्र पाटील यांनी कामगिरी पार पाडली.