प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांची मोठी कारवाई
वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या संघर्ष लॉजवर धाड; दोन महिलांसह लॉज मालक आणि मॅनेजरला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांनी वडवणीमध्ये मोठी कारवाई केली आहे. त्यांनी एका लॉजवर छापा मारून वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूजा पवार यांनी यापूर्वी पिंपळनेरमध्येही अवैध धंद्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे त्यांची जिल्ह्यात चर्चा आहे. पूजा पवार यांनी वडवणीत केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक असल्यामुळे जिल्ह्यात कुठेही कारवाई करू शकतात. त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यात त्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतल्यास अवैध धंदेवाल्यांचा सफाया होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साळींबा रोडवर संघर्ष लॉज आहे. या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या टीमसोबत लॉजवर छापा मारला. त्यावेळी दोन महिला वेश्या व्यवसाय करताना आढळल्या. पोलिसांनी लॉजचे मालक परमेश्वर सव्वाशे आणि मॅनेजर रामेश्वर सव्वाशे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्ष लॉजवर वर्षभरापासून वेश्या व्यवसाय सुरू होता. लॉजवर वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला व मुली येत होत्या. त्यांच्याकडून दोन ते अडीच हजार रुपये दराने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.
डीवायएसपी पूजा पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची परवानगी घेतली. त्यानंतर त्यांनी लॉजवर छापा मारून हे रॅकेट उध्वस्त केले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईबाबत बोलताना एका नागरिकाने सांगितले की, “वडवणी पोलिसांना जे जमले नाही ते पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांनी करून दाखवले.”सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, पीएसआय गोलवाल, मुरली गंगावणे, जिवाजी गंगावणे, महेश गरजे, अनिल मदने व माने मॅडम यांनी केली. या घटनेनंतर पूजा पवार यांच्या कामाचे कौतुक होत आहे. त्यांनी अवैध धंद्यांवर जरब बसवली आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.