विवाह संकेतस्थळावर भेट; लग्नाचे आमिष दाखवून २९ वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला – राज्यात महिला व मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर लग्न जमवणे सामान्य झाले आहे. मात्र, या विश्वासाच्या व्यासपीठाचा गैरवापर करून शिक्षिकेची फसवणूक आणि समाजाच्या नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुर्तीजापूर येथील २९ वर्षीय एका शिक्षिकेवर आरोपी स्वप्नील भिसे याने लग्नाचे स्वप्न दाखवत धोका दिला. आरोपीने प्रेमाचे नाटक करत २८ एप्रिल रोजी आपल्या जालना येथील घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्नास संपूर्णपणे नकार दिला. या घटनेने फक्त शिक्षिकेच्या आयुष्याला नव्हे, तर तिच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. त्यानंतर शिक्षिकेच्या तक्रारीनुसार मुर्तीजापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करत आहेत. सदर प्रकरणाचा तपास पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी जालना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.